Home Breaking News एल निनोची चाहूल; फडणवीस सरकारकडून जलव्यवस्थापन आणि शेती बचावासाठी मोठे पाऊल

एल निनोची चाहूल; फडणवीस सरकारकडून जलव्यवस्थापन आणि शेती बचावासाठी मोठे पाऊल

0
3

पाण्याचा प्रत्येक थेंब जपा! संभाव्य एल निनोसाठी राज्यात आपत्कालीन तयारी सुरू

मुंबई, दि. २० (प्रतिनिधी): संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व्यापक तयारी सुरू केली असून पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध विभागांना तत्काळ उपाययोजना राबविण्याचे आदेश देण्यात आले. संभाव्य कमी पावसाचा सामना करण्यासाठी समन्वय आणि प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये एल निनोचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता असून यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. तसेच उष्णतेच्या लाटा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सध्या राज्यात पाणीसाठा समाधानकारक असला तरी योग्य नियोजन केल्यासच परिस्थिती हाताळता येईल. २०१५ च्या एल निनो अनुभवाचा आधार घेत यावेळी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जलसंधारणावर विशेष भर

‘जलयुक्त शिवार’ आणि ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती करून कमी खर्चात अधिक पाणी साठवणूक करण्यावर भर देण्यात येणार आहे. मनरेगा अंतर्गत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स

पाणी बचतीसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी, सिंचन विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून पाण्याचा काटेकोर वापर सुनिश्चित केला जाणार आहे.

चारा टंचाई टाळण्यासाठी उपाययोजना

पशुधनासाठी चाऱ्याची कमतरता भासू नये यासाठी वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आदेश देण्यात आले. विशेषतः सोलापूर, सांगली आणि मराठवाडा भागात यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

खत वितरणावर एआयची नजर

खतांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ‘अ‍ॅग्रीस्टॅक’ प्रणालीशी जोडणी करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने वितरणावर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी तपासणी यंत्रणा मजबूत केली जाणार आहे.

शेततळे योजनेला प्राधान्य

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना पाणी साठवणुकीसाठी शेततळे योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले. तसेच खत आणि बियाण्यांचा पुरेसा साठा ठेवण्यावर भर देण्यात येत आहे.

कृषी विभाग सज्ज

संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी कृषी विभाग पूर्णपणे सज्ज असून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात येत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here