Home Breaking News एटापल्ली पोलिसांची मोठी कारवाई; थारसह लाखोंचा मद्यसाठा जप्त, आरोपी अटकेत

एटापल्ली पोलिसांची मोठी कारवाई; थारसह लाखोंचा मद्यसाठा जप्त, आरोपी अटकेत

0
3

गोपनीय माहितीवर अचूक सापळा; महिंद्रा थारमधून अवैध दारू वाहतूक उघड

गडचिरोली, दि. २० एप्रिल २०२६ – जिल्ह्यात गेल्या तीन दशकांपासून दारूबंदी असतानाही तस्करांकडून अवैध मद्य वाहतुकीसाठी नवनवीन शक्कल लढवली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एटापल्ली पोलिसांनी आलिशान ‘महिंद्रा थार’ गाडीतून सुरू असलेली दारू तस्करी उधळून लावत सुमारे १४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना १९ एप्रिल रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, एटापल्ली पोलीस स्टेशन हद्दीतून एका चारचाकी वाहनातून देशी व विदेशी मद्याची मोठी खेप तस्करीसाठी नेण्यात येणार आहे. माहितीची खातरजमा करून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली पोलीस पथकाने विविध मार्गांवर सापळा रचला.

दरम्यान, संशयित ‘महिंद्रा थार’ (क्रमांक एमएच ३२ एएस ७०९९) नारानूर–ताडपल्ली मार्गे लांझी गावाच्या दिशेने येताना दिसताच पोलिसांनी वाहन अडवून पंचासमक्ष झडती घेतली. तपासणीदरम्यान वाहनात लपवून ठेवलेला मद्यसाठा उघडकीस आला.

या कारवाईत ‘रॉकेट देशी दारू संत्रा’च्या २९ सीलबंद पेट्या आणि एक पेटी बिअर असा सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. तसेच तस्करीसाठी वापरण्यात आलेली अंदाजे १२ लाख रुपये किमतीची ‘महिंद्रा थार’ गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली. अशा प्रकारे एकूण १४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी मयुर विजय बालमवार (वय २७, रा. गडचिरोली) याच्याविरुद्ध एटापल्ली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), ८३ तसेच मोटार वाहन कायदा कलम १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोल्हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा, गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीविरोधात अशीच कठोर मोहीम सुरू ठेवण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here