वाढत्या उष्णतेत नागरिकांनी आरोग्याची घ्यावी विशेष काळजी — डॉ. अजय कंकडालवार यांचे आवाहन
गडचिरोली, दि. १७ : राज्यभरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, सर्वांनी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वतःची आणि कुटुंबाची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन माजी जिल्हापरिषद अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांनी केले आहे.
सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला असून, दुपारच्या वेळेत उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी शक्यतो विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलका व संतुलित आहार घ्यावा तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची अधिक काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारख्या द्रवपदार्थांचे सेवन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. याशिवाय डोक्यावर टोपी, अंगावर हलक्या रंगाचे सुती कपडे आणि चेहऱ्यावर ओढणी किंवा रुमाल वापरण्याचा सल्लाही त्यांनी नागरिकांना दिला.
“आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. वाढत्या उष्णतेच्या काळात प्रत्येकाने सतर्क राहून सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे आहे,” असे सांगत डॉ. कंकडालवार यांनी नागरिकांनी कोणतीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही आवाहन केले.
राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासह नागरिकांनीही सजग राहून उन्हाळ्याचा सामना करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.