Home Breaking News “PWD आलापल्लीतील निविदांमध्ये मोठा घोटाळा?” — कंत्राटदार संघटनेचा गंभीर आरोप; आमरण उपोषणाचा...

“PWD आलापल्लीतील निविदांमध्ये मोठा घोटाळा?” — कंत्राटदार संघटनेचा गंभीर आरोप; आमरण उपोषणाचा इशारा

0
13

 

“PWD आलापल्लीतील निविदांमध्ये मोठा घोटाळा?” — कंत्राटदार संघटनेचा गंभीर आरोप; आमरण उपोषणाचा इशारा

गडचिरोली : अहेरी उपविभागातील शासकीय कंत्राटदार संघटनेने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आलापल्ली कार्यालयाच्या कामकाजावर गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला. सन 2024-25 व 2025-26 या कालावधीत कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, अनेक निविदा ऑफलाईन पद्धतीने काढून त्या मोजक्या कंत्राटदारांना हेतुपुरस्सर देण्यात आल्या. या प्रक्रियेत शासन नियमांचे उल्लंघन झाले असून, निविदांची माहिती जाणीवपूर्वक गुप्त ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे, ना कार्यालयाच्या सूचना फलकावर माहिती लावण्यात आली, ना स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली, त्यामुळे स्थानिक कंत्राटदारांना पूर्णतः अंधारात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मजूर सहकारी संस्थांनाही नियमबाह्य लाभ?
संघटनेने असा आरोपही केला की, शासनाने निश्चित केलेल्या 33-33-34 टक्के वाटपाच्या नियमाचे उल्लंघन करून 100% कामे मजूर सहकारी संस्थांच्या नावे काढण्यात आली. यामध्ये आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी निविदा प्रक्रिया ‘मॅनेज’ केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

मुख्य मागण्या काय?
कंत्राटदार संघटनेने पुढील ठळक मागण्या मांडल्या आहेत:

मार्च 2026 मधील सर्व ऑफलाईन व मजूर सहकारी संस्थांच्या नावावरील निविदा तात्काळ रद्द कराव्यात
मागील 3 वर्षातील सर्व निविदांची सविस्तर माहिती जाहीर करावी

कामांची फेरनिविदा पूर्णतः पारदर्शक पद्धतीने घ्यावी
मजूर सहकारी संस्थांना केवळ 33% कामे देण्याचा नियम लागू करावा

निविदांची माहिती सूचना फलक व वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करणे बंधनकारक करावे

‘MR पद्धत’ बंद करून ‘Pay to PWD’ प्रणाली लागू करावी

संबंधित टेंडर क्लार्कचा पदभार तात्काळ काढावा
आमरण उपोषणाचा इशारा
“जर 7 दिवसांच्या आत आमच्या मागण्यांवर कार्यवाही झाली नाही, तर 23 एप्रिल 2026 पासून सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल,” असा इशारा संघटनेने दिला आहे. तसेच, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री व इतर वरिष्ठ स्तरावर तक्रार करून न्यायालयीन लढाही उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

पत्रकार परिषदेत उपस्थित
या पत्रकार परिषदेला एल. एम. गद्देवार, एस. एम. गद्देवार, प्रशांत पत्तीवार, बादल शहा, अजय नागुलवर, फैजान खान, संजयकुमार आझाद, कैसर खान, तन्वीर सैय्यद, सुमित मुडावार, तिरुपती पालेवार, अविनाश बोमनवार यांच्यासह अनेक कंत्राटदार उपस्थित होते.
👉 PWD आलापल्लीतील निविदा प्रक्रियेवर उठलेले हे प्रश्न आता प्रशासन कसे हाताळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here