Home Breaking News “डिजिटल शेतीशाळेची क्रांती! हवामान अनुकूल तंत्रज्ञानाने गडचिरोलीतील शेती होणार स्मार्ट”

“डिजिटल शेतीशाळेची क्रांती! हवामान अनुकूल तंत्रज्ञानाने गडचिरोलीतील शेती होणार स्मार्ट”

0
15

८ एप्रिलला ‘जैविक/नैसर्गिक निविष्ठा उत्पादन’ विषयावर विशेष ऑनलाईन मार्गदर्शन सत्र

गडचिरोली, दि. ७ : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेती अधिक सक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात “डिजिटल शेतीशाळा” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा २.०) अंतर्गत जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, शेतकरी व भूमिहीन कुटुंबांना हवामानाशी जुळवून घेणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

हवामान बदलाचा शेतीवर होणारा वाढता परिणाम लक्षात घेऊन गावनिहाय नियोजनावर भर दिला जात आहे. याच अनुषंगाने “हवामान अनुकूल तंत्रज्ञान (CRT)” या विषयावर डिजिटल शेतीशाळेमार्फत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन दिले जात आहे. हा उपक्रम नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे.

ही डिजिटल शेतीशाळा एक प्रभावी ऑनलाईन व्यासपीठ असून, झूम व यूट्यूबच्या माध्यमातून तज्ज्ञ शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांनाही आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती सहज उपलब्ध होत आहे.

दि. ८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित विशेष सत्रात ‘जैविक/नैसर्गिक निविष्ठा उत्पादन’ या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. या सत्रात बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, लिंबोळी अर्क व दशपर्णी अर्क यांसारख्या उपयुक्त आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानांची माहिती दिली जाणार आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी अधिकाधिक शेतकऱ्यांनी या डिजिटल शेतीशाळेत सहभागी होऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन केले आहे.

डिजिटल माध्यमातून शेतीत नवा बदल घडविण्याचा हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी मोठी संधी ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here