![]()
गडचिरोली : मस्जिद चौक येथे नव्याने सुरू झालेल्या गणेश सिनेमॅटिक स्टुडिओला आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी भेट देत तरुण उद्योजक गणेश येलमुले यांच्या यशाचे कौतुक केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तानबोडी या स्वगावातून छोट्या फोटोग्राफी व्यवसायाने सुरुवात केलेल्या गणेश येलमुले यांनी अल्पावधीतच फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लग्न समारंभ, वाढदिवस, विविध कार्यक्रमांचे चित्रीकरण यामध्ये त्यांच्या कामाला मोठी पसंती मिळत आहे.
विशेषतः सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडिओ कंटेंटला लाखो व्ह्यूज मिळत असून, तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत आहे.
या प्रवासात त्यांनी केवळ स्वतःची प्रगती साधली नाही, तर इतर अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. या यशाच्या बळावर त्यांनी अहेरी मुख्यालयात आधुनिक सुविधांनी सुसज्ज असा स्वतःचा स्टुडिओ उभारला आहे. ग्रामीण भागातील तरुणांसाठी त्यांची ही वाटचाल प्रेरणादायी ठरत आहे.
स्टुडिओच्या शुभारंभ प्रसंगी आमदार आत्राम यांनी गणेश यांच्या मेहनतीचे कौतुक करत, “अशा तरुण उद्योजकांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते,” असे मत व्यक्त केले.
यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम तसेच स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.