Home Breaking News “गारपिटीच्या तडाख्यात आरेवाडा अंधारात! चार दिवसांपासून वीज गायब; PHC ठप्प, लसी हलवण्याची...

“गारपिटीच्या तडाख्यात आरेवाडा अंधारात! चार दिवसांपासून वीज गायब; PHC ठप्प, लसी हलवण्याची वेळ”

0
15

 

“गारपिटीच्या तडाख्यात आरेवाडा अंधारात! चार दिवसांपासून वीज गायब; PHC ठप्प, लसी हलवण्याची वेळ”

गडचिरोली, दि. २ एप्रिल : भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथे ३० मार्च रोजी झालेल्या वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार गारपिटीने संपूर्ण परिसराला अक्षरशः हादरवून सोडले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, चार दिवस उलटूनही आरेवाडा गावासह प्राथमिक आरोग्य केंद्र अजूनही अंधारातच आहे.

वादळाचा तडाखा इतका भीषण होता की अनेक ठिकाणी रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडली, तर वीजेचे खांब कोसळल्याने संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. ३० मार्चपासून वीज गायब असल्याने कडाक्याच्या उन्हात ग्रामस्थांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात परिस्थितीत फारसा बदल दिसून येत नाही.

दरम्यान, वीज नसल्यामुळे आरोग्य सेवांवरही गंभीर परिणाम झाला आहे. आरेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) लसी आणि औषधांचा साठा सुरक्षित ठेवणे कठीण झाल्याने सर्व लसी तातडीने भामरागड येथील तालुका आरोग्य अधिकारी (THO) कार्यालयात हलवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अचानक गरज भासल्यास रुग्णांना भामरागड गाठण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

गेल्या चार दिवसांपासून आरोग्य केंद्र अंधारात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाने अद्याप ठोस उपाययोजना न केल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

“आता तरी प्रशासनाचे डोळे उघडणार का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, वीजपुरवठा कधी सुरळीत होणार आणि आरोग्य सेवा पूर्ववत कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here