Home Breaking News दिव्यांगांसाठी दिलासा! गडचिरोलीत तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो लाभार्थ्यांची तपासणी

दिव्यांगांसाठी दिलासा! गडचिरोलीत तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो लाभार्थ्यांची तपासणी

0
17

गडचिरोली, दि. ३० : जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे २३ मार्च व २७ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या अपंगत्व असलेल्या लाभार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून सखोल तपासणी करण्यात आली.

या उपक्रमाचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया विके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. इंद्रजीत नागदेवते, डॉ. परीक्षित चकोले आणि डॉ. बाळू सहारे यांनी लाभार्थ्यांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय अभिप्राय नोंदवले.

शिबिरानंतर पात्र लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुलभ आणि जलदगतीने पूर्ण करण्यात आली. २३ मार्च रोजी तपासलेल्या ८२ व्यक्तींपैकी ४५ जण तर २७ मार्च रोजी तपासलेल्या १२२ व्यक्तींपैकी ६१ जण दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री नागापुरे, श्री वैभव चंडोले, श्री रामू चव्हाण, श्री केशव होळंबे, श्री तरुण पटले यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच तहसील कार्यालय, गडचिरोली येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग नागरिक, त्यांचे नातेवाईक व इतर नागरिक उपस्थित होते.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दिव्यांग विभागामार्फत मागील तीन महिन्यांत तब्बल ९९० दिव्यांग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले असून, दिव्यांग नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

भविष्यातही अशा प्रकारची शिबिरे नियमितपणे आयोजित करण्यात येणार असून, दिव्यांग नागरिकांना पारदर्शक व जलद सेवा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here