“आश्रमशाळेजवळील तलाव ठरला जीवघेणा; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह”;
🗞️गडचिरोली, दि. २८
तालुक्यातील वडेगाव येथील क्रांतिवीर नारायण सिंह उईके आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी वेदांत शंकर पदा (वय ८, रा. नवेझरी) याचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २७ मार्च रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत हा दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास आपल्या चार मित्रांसह शाळेला लागून असलेल्या तलावाच्या दिशेने लघुशंकेसाठी गेला होता.
यावेळी तलावाच्या काठावर खेळत असताना त्याचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच शाळेचे अधीक्षक एच. डी. टेंभुर्णे व इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वेदांतला पाण्याबाहेर काढले.
त्यानंतर त्याला त्वरित कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी कुरखेडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
🔴 सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या दुर्दैवी घटनेनंतर आश्रमशाळेतील सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शाळेत शौचालयाची सुविधा उपलब्ध असताना विद्यार्थ्यांनी तलावाकडे का धाव घेतली? तसेच शाळा सुरू असताना किंवा मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची होती, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
मुख्याध्यापक भोयर यांनी आपण साडेबारा वाजेपर्यंत शाळेत होतो व त्यानंतर घरी गेल्यावर ही माहिती मिळाल्याचे सांगितले. मात्र, प्रशासनाच्या या भूमिकेमुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
⚫ निष्काळजीपणाचा बळी?
या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.