Home Breaking News एटापल्ली एसबीआय बँक फोडण्याचा प्रयत्न करणारा आरोपी गजाआड

एटापल्ली एसबीआय बँक फोडण्याचा प्रयत्न करणारा आरोपी गजाआड

0
35

छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातून आरोपीला ठोकल्या बेड्या ; दोनवेळच्या चोरीचा प्रयत्न उघड

एटापल्ली : एटापल्ली येथील भारतीय स्टेट बँक (SBI)शाखेत दोनवेळा घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आरोपीला जेरबंद करण्यात एटापल्ली पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छत्तीसगड राज्यातून आरोपीला ताब्यात घेतले असून, यामुळे बँकेवर येणारे मोठे संकट टळले आहे.

घटनेचा सविस्तर तपशील असा की, १६ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्री अज्ञात आरोपीने बँकेची खिडकी तोडून आत प्रवेश केला होता. कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन आणि लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक अडचणीमुळे आरोपीला चोरी करता आली नाही. याप्रकरणी एटापल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस या गुन्ह्याचा तपास करत असतानाच, ७ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्री पुन्हा त्याच पद्धतीने बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न झाला. या सलगच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे ठाकले होते.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम व पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे यांनी तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपासावरून पोलिसांना संशयित आरोपी छत्तीसगडमध्ये असल्याची माहिती मिळाली. एटापल्ली पोलिसांच्या पथकाने थेट छत्तीसगडमधील पिव्ही १२, पाखांजूर (जि. कांकेर) येथे धाड टाकून बिभास ऊर्फ संजु बच्चु डे (२३ वर्षे) याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.

आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने दोन्ही वेळा बँकेत चोरीचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १२ जानेवारी २०२६ पर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रोहिणी गिरवलकर करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा, गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मोतीराम मडावी, पोउपनि गजानन साखरे, रोहिणी गिरवलकर, प्रतीक्षा वणवे आणि पोलीस अंमलदारांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here