बिबट्याचा दहशतपूर्ण आंतक; हल्ल्यात चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
गोंदिया : जिल्ह्यासह (GondiaDistrict)तिरोडा तालुक्यात मागील काही दिवसांपासून बिबट्यांचा दहशतपूर्ण संचार वाढला असून, नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) येथे शुक्रवारी (ता. ९) बिबट्याच्या हल्ल्यात एका चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
हियांश शिवशंकर रहांगडाले (वय ४) असे मृत चिमुकल्याचे नाव असून, तो आपल्या आई-वडिलांसोबत घराच्या मागील अंगणात चुलीजवळ बसलेला होता. याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत चिमुकल्याला उचलून नेले. पालकांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो पसार झाला.
यानंतर परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली असता काही अंतरावर चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. या हृदयद्रावक घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले असून संतप्त नागरिकांनी वनविभागाच्या (ForestDepartmentMaharashtra) कार्यप्रणालीविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून गावहद्दीत बिबट्यांचा (Leopard)वावर वाढलेला असून वारंवार हल्ल्याच्या घटना घडत आहेत. याबाबत वेळेत ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. मात्र, वन यंत्रणा अपयशी ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वाढत्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून तातडीच्या उपाययोजनांची जोरदार मागणी होत आहे.