घराच्या परिसरात सुरू होती गांजाची शेती; १६० झाडांसह आरोपीला अटक
गडचिरोली : जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या तस्करीलामुळापासून उपटून टाकण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेला मोठे यश आले आहे. उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या कोरची पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हितकसा येथे पोलिसांनी छापा टाकून चक्क घराच्या परसात (सांदवाडीत) केलेली गांजाची शेती उद्ध्वस्त केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १५ लाख १९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा (LCB) गडचिरोलीला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, कोरची तालुक्यातील हितकसा येथील पुनाराम अलिसाय मडावी (४५) याने आपल्या घराच्या मागच्या भागात छुप्या पद्धतीने अमली पदार्थ (गांजा) ची लागवड केली आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे विशेष पथक तात्काळ हितकसा येथे रवाना झाले.
पोलीस पथकाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुनाराम मडावी याच्या घराची आणि परिसराची झडती घेतली. यावेळी घराच्या सांदवाडीत पोलिसांना धक्कादायक दृश्य दिसले. आरोपीने विक्रीच्या उद्देशाने लहान-मोठी तब्बल १६० गांजाची झाडे लावली होती. ओल्या आणि अर्धसुख्या स्वरूपातील ३०.३७५ किलो गांजा (किंमत १५,१८,७५० रुपये), एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा (किंमत १,००० रुपये). असा एकूण १५,१९,७५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
अमली पदार्थांची बेकायदेशीर लागवड आणि विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केल्याप्रकरणी आरोपी पुनाराम मडावी विरुद्ध पोलीस स्टेशन कोरची येथे एनडीपीएस (NDPS) कायदा १९८५ च्या कलम ८ (क), २०(अ), २०(ब), २० (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि. मुकुंदा देशमुख करत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि. समाधान दौंड, पोलीस अंमलदार रोहित गोंगले, प्रशांत गरफडे, शिवप्रसाद करमे आणि रामदास ऊईनवार यांनी ही धडक कारवाई पूर्ण केली.