Home Breaking News कुरखेडा पोलिसांनी शोधले हरवलेले-चोरीला गेलेले ११ मोबाईल

कुरखेडा पोलिसांनी शोधले हरवलेले-चोरीला गेलेले ११ मोबाईल

0
28

 

सायबर पथकाने ‘CEIR’ पोर्टलच्या मदतीने लावला शोध ; उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या हस्ते वाटप

कुरखेडा : आपला हरवलेला महागडा मोबाईल पुन्हा
मिळेल, ही आशा सोडून दिलेल्या ११ नागरिकांच्या चेहऱ्यावर आज कुरखेडा पोलिसांनी हास्य फुलवले आहे. कुरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेलेले आणि हरवलेले तब्बल ११ मोबाईल संच सायबर गुन्हे तपास पथकाने तांत्रिक कौशल्याच्या जोरावर शोधून काढले असून, आज ते मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले.

हरवलेल्या मोबाईलबाबत नागरिकांनी वेळोवेळी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत, सीईआयआर (CEIR) पोर्टल आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सायबर तपास पथकाने या मोबाईलचा माग काढला. सुमारे २ लाख ४ हजार ५०० रुपये किमतीचे हे विविध कंपन्यांचे मोबाईल संच शोधण्यात पोलिसांना मोठे यश लाभले.

मंगळवार, ५ जानेवारी रोजी कुरखेडा पोलीस स्टेशन येथे एका छोटेखानी कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) रवींद्र भोसले यांच्या हस्ते हे मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी ठाणेदार महेंद्र वाघ, सायबर तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, सहाय्यक शिपाई पंकज नवघरे, अमोल आलाम व राकेश येरणे उपस्थित होते.

मोबाईल संच परत करताना रवींद्र भोसले यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास नागरिकांनी अजिबात वेळ न घालवता तात्काळ आपल्या मोबाईलचा IMEI क्रमांक आणि खरेदी बिलासह जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. यामुळे सायबर विभागाला तांत्रिक तपासाद्वारे मोबाईलचा शोध घेणे जलदगतीने शक्य होते.

अत्यंत कमी कालावधीत तांत्रिक तपास करून सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याबद्दल सायबर तपास पथकाचे जिल्हाभरात कौतुक होत आहे. आपले हरवलेले मोबाईल परत मिळाल्याबद्दल नागरिकांनी कुरखेडा पोलीस दलाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here