
गडचिरोलीत घुमला जिल्हाधिकाऱ्यांच्या गझलचा सूर! साहेबांच्या गायनानं लोक झाले थक्क.
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कृषीमहाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित गडचिरोली महोत्सवाने संपूर्ण जिल्ह्याला भुरळ घातली. विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असलेल्या या सोहळ्यात शनिवारी एक असा प्रसंग घडला, ज्याने उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. जिल्ह्याचे तरुण जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी चक्क माईक हातात घेत गझल गायन केले आणि उपस्थितांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सत्रात जेव्हा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा मंचावर आले, तेव्हा सर्वांना वाटले की ते केवळ शुभेच्छांचे दोन शब्द बोलतील. मात्र, त्यांनी जेव्हा आपल्या आवाजात गझल छेडली, तेव्हा संपूर्ण प्रांगणात शांतता पसरली. एखाद्या कसलेल्या व्यावसायिक गायकाप्रमाणे त्यांनी लावलेला सूर, शब्दांची फेक आणि गझलेतील नजाकत पाहून उपस्थित जनसमुदाय थक्क झाला.
प्रशासकीय कामाचा ताण आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचे हे कलासक्त रूप पाहून गडचिरोलीकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. ‘जिल्हाधिकारी एवढ्या उत्तम रीतीने गाऊ शकतात, हे आमच्यासाठी अविश्वसनीय होते, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेक उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या या सादरीकरणाने महोत्सवात एक वेगळीच रंगत आणली.
तत्पूर्वी याच सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली विशेष उपस्थिती लावली. राजकारणाच्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत मुख्यमंत्र्यांनी या महोत्सवाचा निवांत आनंद लुटला. गडचिरोलीच्या मातीतील कला आणि संस्कृतीचा आविष्कार असलेल्या ‘रेला’ नृत्याची झलक पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमात वारंवार टाळ्या वाजवून स्थानिक कलाकारांना आणि जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमाला मनापासून दाद दिली.
२६ तारखेपासून सुरू झालेल्या या महोत्सवात गडचिरोलीच्या दुर्गम भागातील कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा पोलीस दलाचा हा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमानंतर, २७ रोजी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘मॅरेथॉन’ने या महोत्सवाचा समारोप झाला. जिल्हाधिकाऱ्यांची गझल आणि मुख्यमंत्र्यांची उपस्थिती यामुळे हा ‘गडचिरोली महोत्सव’ जिल्ह्याच्या इतिहासात प्रदीर्घ काळ स्मरणात राहील, यात शंका नाही.