Home Breaking News अनाथ मुलाच्या जिद्दीला मिळाले मुनगंटीवारांचे बळ; खुशाल गेडाम बनला कारागृह पोलीस कॉन्स्टेबल

अनाथ मुलाच्या जिद्दीला मिळाले मुनगंटीवारांचे बळ; खुशाल गेडाम बनला कारागृह पोलीस कॉन्स्टेबल

0
7

आई-वडिलांच्या निधनानंतरही हार मानली नाही; एका शिफारस पत्राने बदलले आयुष्य, संघर्षातून गाठले यशाचे शिखर

चंद्रपूर |  जिद्द, मेहनत आणि योग्य वेळी मिळालेल्या सहकार्याच्या जोरावर एका अनाथ युवकाने आपल्या आयुष्याला यशाची नवी दिशा दिली आहे. मुल तालुक्यातील गोलाभुज येथील रहिवासी खुशाल सुरेश गेडाम यांची नागपूर येथे कारागृह पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड झाली असून त्यांच्या संघर्षमय प्रवासाची सर्वत्र चर्चा होत आहे. या यशामागे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या शैक्षणिक मदतीचा मोठा वाटा असल्याचे खुशाल यांनी सांगितले.

खुशाल यांचे वडील सुरेश गेडाम यांचे २०१२ मध्ये निधन झाले. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत, २०१४ मध्ये आईचेही निधन झाले. वयाच्या केवळ नवव्या वर्षी आई-वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही.

बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात आडव्या येत होत्या. अशा परिस्थितीत त्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मदतीची विनंती केली. खुशाल यांची परिस्थिती लक्षात घेऊन मुनगंटीवार यांनी सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना शिफारस पत्र देत सिंदेवाही येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वस्तीगृहात त्यांचा प्रवेश निश्चित केला. या एका निर्णयामुळे खुशाल यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांनी बी.ए. पदवी पूर्ण केली.

पदवी शिक्षणानंतर खुशाल यांनी पोलीस दलात भरती होण्याचे ध्येय निश्चित केले. आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक संकटांशी झुंज देत त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या मेहनतीला अखेर यश मिळाले आणि नागपूर येथे त्यांची कारागृह पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड झाली.

यशानंतर भावना व्यक्त करताना खुशाल गेडाम म्हणाले, “आई-वडिलांच्या निधनानंतर आयुष्य अंधारमय झाले होते. मात्र शिक्षणासाठी मिळालेल्या मदतीमुळे माझ्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. आज मी पोलीस दलात दाखल होऊ शकलो, यामागे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे मोलाचे योगदान आहे.”

खुशाल यांच्या निवडीमुळे गोलाभुज गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांनीही आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले आहेत. एका शिफारस पत्रातून मिळालेली शिक्षणाची संधी आणि त्यातून घडलेले यश हे समाजकारणाच्या सकारात्मक शक्तीचे उदाहरण ठरले आहे. अनाथ मुलाच्या संघर्षातून उभी राहिलेली ही यशोगाथा आज अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

“एका पत्राने बदलले नशीब!”

शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या खुशाल गेडाम यांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या शिफारस पत्रामुळे शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळाला. याच संधीचा लाभ घेत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले आणि आज कारागृह पोलीस कॉन्स्टेबल पदापर्यंत मजल मारत संघर्षाचे सोनं केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here