![]()
नेटवर्कअभावी हजारो पात्र महिला लाभापासून वंचित; विशेष शिबिरे व मुदतवाढीची मागणी
गडचिरोली, : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून राज्यभरातील तब्बल ८० लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांनी सरकारवर जोरदार टीका करत हा महिलांच्या विश्वासाचा घात असल्याचा आरोप केला आहे.
भाग्यश्रीताई आत्राम म्हणाल्या की, निवडणुकीपूर्वी महिलांना ‘लाडकी बहीण’ म्हणून संबोधत या योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला. मात्र निवडणूक संपल्यानंतर निकषांच्या नावाखाली लाखो महिलांना अपात्र ठरविले जात आहे. “निवडणुकीपुरत्याच बहिणी लाडक्या होत्या का?” असा थेट सवाल त्यांनी सरकारला केला.
त्या पुढे म्हणाल्या की, सरकारने महिलांना दिलेला शब्द पाळलेला नाही. निवडणुकीत राजकीय लाभ मिळवण्यासाठी महिलांना मोठमोठी आश्वासने देण्यात आली, परंतु आता त्याच महिलांना विविध कारणे दाखवत योजनेपासून दूर केले जात आहे. हा महिलांच्या भावनांशी खेळ असून त्यांचा विश्वासघात आहे.
गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्ह्यात अनेक गावांमध्ये आजही मोबाईल नेटवर्कची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक पात्र महिलांना ई-केवायसी व आधार लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. तांत्रिक अडचणींमुळे लाभापासून वंचित राहणाऱ्या महिलांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“सरकारला निवडणुकीच्या वेळी बहिणी लाडक्या वाटल्या, पण आता केवायसीच्या नावाखाली त्यांनाच योजनेतून बाहेर काढले जात आहे. ज्या गावात नेटवर्कच नाही, तेथील गरीब महिलांनी ई-केवायसी करायची कशी?” असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
यासोबतच गडचिरोली जिल्ह्यात विशेष शिबिरे आयोजित करून ऑफलाइन केवायसीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र भगिनीला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ नियमितपणे मिळाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडली.