![]()
MPSC मध्ये राज्यात दुसरे स्थान मिळवणारे कोल्हापूरचे सुपुत्र शुभम पाटील अहेरीचे नवे उपविभागीय अधिकारी; नागरिकांना ‘सहज उपलब्ध अधिकारी’ होण्याचा निर्धार
गडचिरोली :
अहेरी, “स्वतःचं बलस्थान ओळखा, सातत्य ठेवा आणि स्मार्ट वर्क करा… यश तुमचंच असेल!” — हा मंत्र देत एमपीएससी परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावणारे उपजिल्हाधिकारी शुभम गणपती पाटील आता आदिवासीबहुल अहेरी उपविभागाचे नवे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) म्हणून रुजू झाले आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे अहेरी उपविभागात प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील साजनी या छोट्याशा गावातून सुरू झालेला शुभम पाटील यांचा संघर्षमय प्रवास आज लाखो स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. प्राथमिक शिक्षक असलेल्या वडिलांचा आणि गृहिणी असलेल्या आईचा आधार, जिद्द, अभ्यासाचं काटेकोर नियोजन आणि स्वतःच्या क्षमतेवर असलेला विश्वास यांच्या जोरावर शुभम यांनी यशाचं शिखर गाठलं.
दुसऱ्याच प्रयत्नात राज्यात दुसरे स्थान
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून बीएससी (केमिस्ट्री) शिक्षण घेत असतानाच शुभम यांनी स्पर्धा परीक्षेचा पाया मजबूत केला. एनसीईआरटी पुस्तकांचा अभ्यास, बेसिक संकल्पनांवर पकड आणि नियोजनबद्ध अभ्यास यामुळे त्यांनी पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवा परीक्षेत 22 वा क्रमांक मिळवला. त्यानंतर अधिक आत्मविश्वासाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करत त्यांनी दुसऱ्याच प्रयत्नात एमपीएससीमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावत मोठी कामगिरी केली.
‘हार्ड वर्क’पेक्षा ‘स्मार्ट वर्क’चा मंत्र
एमपीएससीचा अभ्यास करताना शुभम यांनी “कमी पुस्तकं, जास्त रिव्हिजन” हा फॉर्म्युला वापरला. अभ्यासक्रम नीट समजून घेत, गेल्या पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करत त्यांनी हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्कवर भर दिला. सातत्य, चिकाटी आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती हेच यशाचं रहस्य असल्याचं ते सांगतात.
गडचिरोलीशी आधीपासूनच नाळ
शुभम पाटील यांनी यापूर्वी गडचिरोली येथे तीन महिने तहसीलदार म्हणून जबाबदारी सांभाळली, तर गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथेही तहसीलदार म्हणून कार्य केले. आता पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात अहेरीचे उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाल्याने प्रशासनात नवी ऊर्जा निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे.
‘प्रशासन आणि नागरिकांतील दरी कमी करणार’
शासकीय सेवेत येण्यामागे समाजासाठी काम करण्याची भावना, नागरिकांच्या समस्या सोडवण्याची इच्छा आणि प्रशासन सर्वसामान्यांसाठी सहज उपलब्ध करण्याचा हेतू असल्याचे शुभम पाटील सांगतात. “अधिकारी आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी करून प्रत्येकासाठी सहज उपलब्ध अधिकारी होण्याचा प्रयत्न राहील,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. विशेषतः समाजातील वंचित आणि तृतीयपंथीय समुदायासाठी काम करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.
अहेरीकरांकडून स्वागत
नुकतेच अहेरी येथे उपविभागीय अधिकारी (पर्यवेक्षाधीन कालावधी) म्हणून रुजू झालेल्या शुभम पाटील यांचे अहेरी नगरीत स्वागत होत असून, आदिवासीबहुल अहेरी उपविभागात शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवतील, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
एमपीएससीच्या लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेले शुभम पाटील आता अहेरीच्या प्रशासनातही ‘स्मार्ट वर्क’ आणि लोकाभिमुख कामकाजाचा नवा आदर्श निर्माण करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.