![]()
२०११ मध्ये पोलीस भरतीपासून PSI पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर घडविले यश
सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि विकासापासून काहीसे दूर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील छोट्याशा जानमपल्ली गावाने पुन्हा एकदा अभिमानास्पद यशाची नोंद केली आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतून संघर्ष करत, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मोठं स्वप्न साकार करणारे संपतकुमार गंड्रकोटा यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाली असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लहानपणापासूनच प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत वाढलेल्या संपतकुमार गंड्रकोटा यांनी कष्ट, शिस्त आणि आत्मविश्वास यांना आपल्या आयुष्याचे ब्रीद बनवले. आपल्या ध्येयाप्रती असलेली निष्ठा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर त्यांनी २०११ मध्ये पोलीस भरतीत यश मिळवत सेवेत प्रवेश केला. मात्र, एवढ्यावर समाधान न मानता त्यांनी शिक्षण आणि अभ्यासाची वाट कायम ठेवत मोठ्या पदासाठी संघर्ष सुरूच ठेवला.
पोलीस विभागात कार्यरत असतानाच सतत अभ्यास, कठोर मेहनत आणि स्वतःवरील विश्वासाच्या बळावर त्यांनी विभागीय PSI परीक्षा उत्तीर्ण करत मोठे यश संपादन केले. त्यांच्या या यशाने केवळ कुटुंबीयांनाच नव्हे, तर संपूर्ण जानमपल्ली गावाला अभिमानाची भावना दिली आहे.
अतिदुर्गम ग्रामीण भागातील युवकांसाठी संपतकुमार गंड्रकोटा हे आज प्रेरणास्थान ठरत असून, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.
त्यांच्या PSI पदावरील निवडीमुळे परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत असून, युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संपतकुमार गंड्रकोटा यांना PSI पदावर निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!