![]()
अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त
गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा वनपरिक्षेत्रात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात वनविभागाने मोठी धडक कारवाई करत रेती माफियांना जबरदस्त झटका दिला आहे. गुप्त माहितीच्या आधारे रात्री टाकलेल्या सापळ्यात अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडण्यात आला असून संबंधितावर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वनपरिक्षेत्र कुरखेडा अंतर्गत चारभट्टी नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक १७४ मध्ये अवैध रेती उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. माहितीची गांभीर्याने दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. एल. एम. गोपुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने ९ मे २०२६ रोजी रात्री सापळा रचला.
दरम्यान, छापेमारीदरम्यान धानोरी येथील रहिवासी धनंजय गोमाजी बन्सोड यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक MH33AC4341 अवैध रेतीची वाहतूक करताना आढळून आला. वन पथकाने तत्काळ कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केला आणि संबंधिताविरुद्ध वनगुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे.
या धडक मोहिमेत पलसगडचे क्षेत्रसहाय्यक बी. बी. तुलावी, वनरक्षक मुकेश सयाम (चारभट्टी), के. के. काशिवार (पलसगड), एम. के. दूधबळे (वडेगाव), तसेच वनमजूर मधुकर दरवडे आणि वाहनचालक चेतन कुमरे यांनी सक्रिय सहभाग घेत कारवाई यशस्वी केली.
दरम्यान, वनसंपदेचे नुकसान करून अवैधरित्या रेती उपसा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. या कारवाईनंतर परिसरातील अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास कुरखेडा वनपरिक्षेत्र करीत आहे.