![]()
पीसीओडीग्रस्त मुली व महिलांना मिळणार तज्ज्ञ उपचार, समुपदेशन आणि जीवनशैली मार्गदर्शन
गडचिरोली, : महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या PCOD (Polycystic Ovarian Disease) या आजाराच्या प्रभावी निदान व उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे विशेष PCOD क्लिनिक सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन 6 मे 2026 रोजी उत्साहात संपन्न झाले. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक मुली व महिलांमध्ये पीसीओडीची समस्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. मासिक पाळी अनियमित होणे, वजन वाढणे, चेहऱ्यावर अनावश्यक केस येणे, मुरूम होणे तसेच गर्भधारणेमध्ये अडचणी निर्माण होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. योग्य वेळी निदान, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तज्ज्ञ उपचारांच्या माध्यमातून या समस्येवर नियंत्रण मिळवता येते.
महिलांना एकाच ठिकाणी वैद्यकीय तपासणी, समुपदेशन, आहार व जीवनशैलीबाबत मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालयात हे विशेष क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. या क्लिनिकमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मानसी कांबळे या दर बुधवारी पीसीओडीग्रस्त मुली व महिलांची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे उपस्थित होत्या. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबरीश तिवारी, डॉ. इंद्रजीत नागदेवते, डॉ. मनीष मेश्राम, डॉ. बागराज धुर्वे, सहाय्यक अधिसेविका श्रीमती आशा बावणे तसेच नर्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या श्रीमती मेघा कुलसुंगे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाला नर्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या पाठ्यनिर्देशिका, नर्सिंग विद्यार्थी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. वर्षा लहाडे यांनी सांगितले की, “PCOD हा महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणारा आजार असून योग्य वेळी निदान आणि सकारात्मक जीवनशैलीच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. महिलांनी आरोग्याबाबत सजग राहून कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.”
महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत जनजागृती आणि तज्ज्ञ वैद्यकीय सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालयाचा हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.