![]()
रानडुकराच्या हल्ल्यातील जखमींना जीवदान; १०२-१०८ रुग्णवाहिकांची विजेच्या वेगाने धाव
गडचिरोली दि. ३ मे भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुल्ला पिडसे यांना शासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे अक्षरशः जीवदान मिळाले. दुर्गम जंगल क्षेत्रात घटना घडल्याने ग्रामस्थांनी जखमींना कावडीवरून मुख्य रस्त्यापर्यंत आणले. मात्र, त्याठिकाणी आधीच १०२ (लाहेरी) आणि १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सज्ज उभ्या असल्याने उपचारासाठी वेळ न दवडता तातडीने भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांच्या जलद प्रतिसादामुळे जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
दुर्गम गडचिरोलीत आरोग्य सेवेची मजबूत साखळी
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागांमध्येही तातडीची वैद्यकीय मदत पोहोचावी यासाठी जिल्हा प्रशासनाने रुग्णवाहिका सेवांचे जाळे भक्कम केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात १०२ आणि १०८ या दोन्ही सेवा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत.
ग्रामीण भागासाठी ६६ रुग्णवाहिका तैनात
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले की, ग्रामीण स्तरावर सेवा पोहोचवण्यासाठी एकूण ६६ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) येथे – ५२ रुग्णवाहिका
प्राथमिक आरोग्य पथक (PHU) साठी – १४ रुग्णवाहिका
या रुग्णवाहिका प्रामुख्याने गरोदर माता, बालकं आणि ग्रामीण रुग्णांसाठी विनामूल्य सेवा देतात.
रुग्णालय स्तरावर ४१ रुग्णवाहिका सज्ज
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील विविध ग्रामीण, उपजिल्हा व सामान्य रुग्णालयांमध्ये मिळून ४१ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांना मोठ्या रुग्णालयात हलवणे सुलभ झाले आहे.
१०८ आपत्कालीन सेवा—जीवनरक्षक यंत्रणेसह
अपघात व अत्यावश्यक परिस्थितीसाठी जिल्ह्यात १०८ क्रमांकाच्या १० रुग्णवाहिका उपलब्ध असून त्यापैकी
२ ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट (ALS) – अहेरी, कुरखेडा
८ बेसिक लाईफ सपोर्ट (BLS)
या सर्व रुग्णवाहिका अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहेत.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तात्काळ १०८ क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
(ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते की, दुर्गम भागातही शासकीय आरोग्य यंत्रणा वेळेवर धाव घेतल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात.)