![]()
PSI निकिता खेडेकर व ट्रॅफिक पथकाची जलद कारवाई; नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास दृढ
गडचिरोली, दि. ३० एप्रिल २०२६ अहेरी पोलिसांच्या दक्ष आणि तत्पर कारवाईमुळे एका वयोवृद्ध नागरिकाचा हरवलेला १३ हजार रुपयांचा ऐवज अवघ्या काही तासांत शोधून त्याच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेची आणि संवेदनशीलतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गट्टू नानाय्या कन्नाबईना (रा. देवलमरी, ता. अहेरी, जि. गडचिरोली) हे वयोवृद्ध व्यक्ती दि. ३० एप्रिल रोजी दुपारी सुमारे १ वाजता अहेरी पोस्ट येथे आले. आलापल्ली पोलिस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक (PSI) निकिता खेडेकर यांनी त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी आपल्याकडील १३ हजार रुपयांची रक्कम हरवल्याची माहिती दिली.
सदर वयोवृद्ध व्यक्ती देवलमरी येथून वेंकटापूर–गोमनी मार्गावरील खाजगी बोलेरो पिकअप वाहनाने अहेरी येथे घरगुती साहित्य खरेदीसाठी आले होते. त्यांच्या जवळील रोख रक्कम निळ्या रंगाच्या पिशवीत ठेवलेली होती. अहेरी येथे उतरल्यावर संबंधित वाहन पुढे निघून गेल्याने त्यांची पिशवी वाहनातच राहून गेली.
ही बाब समजताच PSI निकिता खेडेकर यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेत ट्रॅफिक विभागातील ज्ञानेश्वर निलावार (मेजर) यांच्याशी संपर्क साधला. संबंधित वाहनाचा शोध घेतला असता ते आलापल्ली–मुलचेरा मार्गावर आढळून आले. वाहनाची सखोल तपासणी केली असता केबिनमध्ये निळ्या पिशवीत १३ हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. वाहन चालकास याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट झाले.
ट्रॅफिक पोलिसांनी सदर रक्कम ताब्यात घेऊन PSI निकिता खेडेकर व अहेरी पोलिसांच्या उपस्थितीत सुपूर्द केली. पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रक्कम तात्काळ संबंधित वयोवृद्ध गट्टू नानाय्या कन्नाबईना यांच्या स्वाधीन करण्यात आली.
हरवलेला ऐवज परत मिळाल्याने वयोवृद्धाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकला. अहेरी पोलिसांच्या या तत्पर व जनहितकारी कामगिरीमुळे “पोलीस तुमच्या सेवेत” ही भावना अधिक दृढ झाली असून, नागरिकांमध्ये पोलिसांविषयीचा विश्वास आणखी बळकट झाला आहे.