Home Breaking News अहेरी पोलिसांची तत्परता; वयोवृद्धाचा हरवलेला १३ हजारांचा ऐवज काही तासांत परत

अहेरी पोलिसांची तत्परता; वयोवृद्धाचा हरवलेला १३ हजारांचा ऐवज काही तासांत परत

0
17

अहेरी पोलिसांची तत्परता; वयोवृद्धाचा हरवलेला १३ हजारांचा ऐवज काही तासांत परत

गडचिरोली : दि. ३० एप्रिल २०२६ अहेरी पोलिसांनी दाखवलेल्या तात्काळ कृतीमुळे एका वयोवृद्ध नागरिकाचा हरवलेला १३ हजार रुपयांचा ऐवज काही तासांत शोधून त्याच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे अहेरी पोलिसांच्या कार्यतत्परतेचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास गट्टू नानाय्या कन्नाबईना (रा. देवलमरी, ता. अहेरी, जि. गडचिरोली) हे वयोवृद्ध व्यक्ती अहेरी पोस्ट येथे आले. आलापल्ली पोलिस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक (PSI) निकिता खेडेकर यांनी त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी आपल्याकडील १३ हजार रुपयांची रक्कम हरवल्याची माहिती दिली.

सदर वयोवृद्ध व्यक्ती देवलमरी येथून खाजगी बोलेरो पिकअप वाहनाने (वेंकटापूर – गोमनी मार्ग) अहेरी येथे घरगुती साहित्य खरेदीसाठी आले होते. त्यांच्या जवळील रोख रक्कम निळ्या रंगाच्या पिशवीत होती. अहेरी येथे उतरल्यावर संबंधित वाहन पुढे निघून गेल्याने त्यांची पिशवी वाहनातच राहून गेली.

ही माहिती मिळताच PSI निकिता खेडेकर यांनी तत्काळ तपास सुरू करत ट्रॅफिक विभागातील ज्ञानेश्वर निलावार (मेजर) यांच्याशी संपर्क साधला. संबंधित वाहनाची माहिती मिळवून शोधमोहीम हाती घेण्यात आली. काही वेळातच हे वाहन आलापल्ली–मुलचेरा मार्गावर आढळून आले.

वाहनाची तपासणी केली असता, केबिनमध्ये निळ्या पिशवीत १३ हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. वाहनचालकास याबाबत कोणतीही माहिती नव्हती. ट्रॅफिक पोलिसांनी सदर रक्कम ताब्यात घेऊन ती PSI निकिता खेडेकर व अहेरी पोलिसांच्या उपस्थितीत सुपूर्द केली.

त्यानंतर ही रक्कम तात्काळ संबंधित वयोवृद्ध गट्टू नानाय्या कन्नाबईना यांच्या स्वाधीन करण्यात आली. हरवलेली रक्कम परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकला.

अहेरी पोलिसांच्या या तत्पर आणि संवेदनशील कामगिरीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला असून, “पोलीस सदैव जनतेच्या सेवेसाठी” ही प्रतिमा पुन्हा अधोरेखित झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here