![]()
गडचिरोली, दि. २३ — महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक-२०२६ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात मतदान प्रक्रिया रविवार, दि. २६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी Avishyanth Panda यांनी दिली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली असून पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या निवडणुकीसाठी गडचिरोली शहरात मतदान केंद्र क्रमांक १/१ निश्चित करण्यात आले आहे. हे केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कॉम्पलेक्समधील तळमजल्यावर, जुने शल्य चिकित्सक कक्षाजवळ असलेल्या प्रशिक्षण केंद्रात कार्यरत राहणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, मतदानासाठी येणाऱ्या मतदारांनी ओळख पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे ओळखपत्र, नोंदणी प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक वैध ओळखपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे.
जिल्हाधिकारी पंडा यांनी सर्व पात्र मतदारांना आवाहन करताना सांगितले की, लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असेही त्यांनी नमूद केले आहे.