![]()
प्राणहिता प्रकल्पाखालील जंगल जळतंय; मौल्यवान वनसंपत्ती धोक्यात ! रामायपेठा परिसरात आगीचा कहर; वन्यजीवांच्या जीवावर बेतलं संकट
गडचिरोली : एफडीसीएम (प्राणहिता वन प्रकल्प) अंतर्गत आलापल्लीजवळील जंगलात भीषण आग भडकून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आलापल्ली–मुलचेरा मार्गावरील रामायपेठा लगत अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर लागलेल्या या आगीने विक्राळ रूप धारण केले असून, आगीचे लोट आकाशाला भिडत असल्याचे भयावह दृश्य पाहायला मिळत आहे.
या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर मौल्यवान वनसंपत्ती जळून खाक होण्याचा धोका निर्माण झाला असून, पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे. जैवविविधतेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असून, वन्यप्राण्यांच्या जीवितालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. आगीच्या वाढत्या विळख्यामुळे वन्यजीवांचे स्थलांतर वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाची भीती अधिक तीव्र झाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार, आग लागल्यानंतरही वनविभागाकडून तातडीची कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही. परिणामी, आगीचा फैलाव वेगाने वाढत असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन यंत्रणा राबवून आग नियंत्रणात आणण्याची जोरदार मागणी केली आहे. अन्यथा ही आग आणखी भडकून संपूर्ण परिसरासाठी मोठे पर्यावरणीय संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
“वनविभागाने तातडीने हालचाल करून आग आटोक्यात आणावी, अन्यथा अपरिमित नुकसान अटळ आहे,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
जंगल जळतंय, प्रशासन शांत; पर्यावरणीय आपत्तीची चाहूल