Home Breaking News एटापल्लीतील कामांची निविदा ‘बाहेरून’; स्थानिक कंत्राटदारांवर अन्याय?

एटापल्लीतील कामांची निविदा ‘बाहेरून’; स्थानिक कंत्राटदारांवर अन्याय?

0
13

अहेरी उपविभागातील कामांवर ‘गडचिरोली क्र.2’चा अतिक्रमण? कंत्राटदारांचा संताप

🗞️📍गडचिरोली : अहेरी उपविभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विकास कामांवर अधिकार संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. शासकीय कंत्राटदार संघटना, उपविभाग अहेरी यांनी आज अहेरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत, आलापल्ली विभागाच्या अधिकार क्षेत्रातील कामांची निविदा गडचिरोली क्रमांक 2 विभागाकडून राबविण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

संघटनेच्या निवेदनानुसार, अहेरी उपविभागात आलापल्ली व सिरोंचा असे दोन सार्वजनिक बांधकाम विभाग असून, अहेरी, एटापल्ली, मूलचेरा व भामरागड या तालुक्यांतील विकास कामे प्रस्तावित करणे, मंजुरी देणे व निविदा प्रक्रिया राबविण्याचा अधिकार हा केवळ आलापल्ली विभागाला आहे. मात्र, मौजा कसनसूर व सेवारी (ता. एटापल्ली) येथील कामांची निविदा प्रक्रिया गडचिरोली क्र.2 विभागाकडून राबविण्यात आल्याने स्थानिक कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

कंत्राटदार संघटनेने हा प्रकार “अवैध व अधिकार क्षेत्रातील अतिक्रमण” असल्याचे म्हटले असून, यामुळे स्थानिक कंत्राटदारांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, दिनांक 25 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या इ-निविदा सूचना क्रमांक 72 व 73 तात्काळ रद्द करून संबंधित कामांची फेरनिविदा आलापल्ली विभागामार्फत काढण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास सर्व कंत्राटदार न्यायालयात याचिका दाखल करण्याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सा. बांध. विभागातील अधिकार संघर्ष चिघळला; निविदा रद्द न केल्यास उपोषणाचा इशारा

या संदर्भात अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता (नागपूर) तसेच संबंधित अधिकाऱ्यांना प्रतिलिपी देण्यात आली असून, आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here