Home Breaking News “३६ वर्षांची ज्ञानसेवा आणि धर्मकार्याची अखंड परंपरा; रमण ‘बुज्जी भैय्या’ कोम्मेरा यांचा...

“३६ वर्षांची ज्ञानसेवा आणि धर्मकार्याची अखंड परंपरा; रमण ‘बुज्जी भैय्या’ कोम्मेरा यांचा सन्माननीय सेवानिवृत्ती सोहळा”

0
17

 

“३६ वर्षांची ज्ञानसेवा आणि धर्मकार्याची अखंड परंपरा; रमण ‘बुज्जी भैय्या’ कोम्मेरा यांचा सन्माननीय सेवानिवृत्ती सोहळा”

गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा येथे जन्मलेले आणि तब्बल ३६ वर्षे शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत असताना धार्मिक कार्यातही सक्रिय सहभाग नोंदवणारे ज्येष्ठ शिक्षक रमण उर्फ ‘बुज्जी भैय्या’ कोम्मेरा आज सेवानिवृत्त झाले. शिक्षकी पेशासोबतच पुरोहित म्हणूनही त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सिरोंच्याचे गाव पुरोहित किस्टय्या महाराज नाना यांचे जेष्ठ चिरंजीव असलेल्या रमण भैय्यांनी १९९१ साली धर्मराव संस्थेत शिक्षक पदावर आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९९१ ते १९९३ दरम्यान अहेरी येथे त्यांनी सेवा बजावली. त्यानंतर असरली येथे बदली होऊन १९९६ पर्यंत त्यांनी तेथे कार्य केले. पुढे १९९६ मध्ये पुन्हा अहेरी येथील धर्मराव शाळेत रुजू होत २००८ पर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आपली वेगळी छाप निर्माण केली.

२००८ मध्ये आपल्या मूळ गावी सिरोंचा येथे बदली झाल्यानंतर त्यांनी अखेरपर्यंत ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले. शिक्षक म्हणून कार्य करत असतानाच धर्माप्रती असलेली निष्ठा जपत त्यांनी विविध धार्मिक विधींमध्येही सक्रिय सहभाग घेतला. अहेरी, सिरोंचा तसेच दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क असून सर्व समाजघटकांशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले.

कोणताही सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रम असो, बोलावणे आले की तत्परतेने उपस्थित राहणे ही त्यांची खास ओळख होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत, हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे.

सेवानिवृत्तीनंतरही रमण भैय्या समाजकार्यात सक्रिय राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आरोग्यदायी आणि सुखमय जीवनाच्या सर्व स्तरातून हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here