📰 किष्टापूर उपक्षेत्रातील दोडगेर येथे कारवाई; वनविभागाचा इशारा – जंगलाला आग लावणे हा गंभीर गुन्हा
गडचिरोली : (देचली) – तेंदू हंगाम जवळ येत असताना जंगलात जाणूनबुजून आग लावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर देचली वन परीक्षेत्र कार्यालयाने कठोर भूमिका घेत धडक कारवाई सुरू केली असून, ताज्या कारवाईत चार जणांना जंगलात आग लावताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.
किष्टापूर उपक्षेत्रातील दोडगेर येथील नियत क्षेत्र कक्ष क्रमांक ०२१ मध्ये ही घटना उघडकीस आली. वन कर्मचाऱ्यांनी सापळा रचून जम्पा रामा तलांडी, चिनी मल्लेश तलांडी, रोजा जम्पा तलांडी आणि विज्या कोहला मडावी (सर्व रा. दोडगेर) यांना रंगेहात पकडले. संबंधित आरोपींविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेंदू झाडांना नवीन पालवी फुटावी आणि चांगली पाने यावीत, या गैरसमजामुळे काही ठिकाणी जंगलात आग लावण्याची प्रथा वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, काही तेंदू कंत्राटदारांकडून गावकऱ्यांना यासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहितीही समोर येत आहे. मात्र, या प्रकारामुळे जंगल परिसंस्थेला मोठा फटका बसत असून जैवविविधतेचे नुकसान होत आहे.
देचली वन परीक्षेत्राने गेल्या पंधरा दिवसांत दोन वेळा अशा प्रकारांवर कारवाई करून आरोपींना रंगेहात पकडले आहे. त्यामुळे जंगलात आग लावणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही कारवाई वन परीक्षेत्र अधिकारी रत्नाकर बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक एन. पी. कुळमेथे तसेच वनरक्षक एस. एस. कुमोटी, एन. एस. कोरेत, जी. आर. खांडेकर आणि एम. एस. काळे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
वन विभागाने नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, जंगलात आग लावणे हा गंभीर व दंडनीय गुन्हा असून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. त्यामुळे अशा कृत्यांपासून दूर राहून वनसंवर्धनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📢
“जंगल वाचवा – भविष्य वाचवा; आग लावणाऱ्यांवर आता थेट कारवाई!”