आमगावात आधुनिक अभ्यासिकेचे भूमिपूजन; आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचा शिक्षणाला प्राधान्याचा ठाम संदेश
गडचिरोली : आमगाव, श्रीराम नवमीच्या पवित्र औचित्य साधत आमगाव येथे विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज अभ्यासिकेच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमातून शिक्षणाला प्राधान्य देण्याच्या त्यांच्या भूमिकेचा पुन्हा प्रत्यय आला.
निवडून आल्यापासून आमदार नरोटे यांनी आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांना सर्वोच्च प्राधान्य दिले असून, त्याचाच एक भाग म्हणून विविध ठिकाणी अद्ययावत अभ्यासिका उभारण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेले दर्जेदार वातावरण उपलब्ध करून देण्याचा या प्रकल्पामागील उद्देश आहे.
यावेळी उपस्थित तरुणांशी संवाद साधताना आमदार नरोटे यांनी पारंपरिक चौकटीबाहेर पडून आधुनिक शिक्षणाच्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. “ग्रामीण भागातील तरुणांनी केवळ मर्यादित क्षेत्रांपुरते न राहता जागतिक स्तरावरील संधींचा शोध घ्यावा,” असे त्यांनी सांगितले. ही आधुनिक अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी हक्काची अभ्यासाची जागा ठरणार असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. श्रीराम नवमीच्या शुभदिनी शिक्षणाचे हे दालन उभे करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेत असल्याचा अभिमान त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, सेवानिवृत्त न्यायाधीश सुनीलजी दीक्षित, सोपानजी नैताम, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकरजी भांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष नरेशजी अलसावार, निरजजी रामानुजनवार, अनिताताई रॉय यांच्यासह गावातील नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.